लखनौ विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापकाला विद्यार्थिनीशी अश्लील संभाषण केल्याप्रकरणी अटक केली आहे. शिवाय त्यासाठी शारिरीक सुखाच्या बदल्यात तुला पेपर देतो, अशी संतापजनक मागणी केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.
लखनौ विद्यापीठात शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र (झूऑलॉजी) विभागातील एक सहाय्यक प्राध्यापक परमजीत सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे. प्राध्यापकावर एका विद्यार्थिनीसोबत फोनवर अश्लील संभाषण केल्याचा आणि तिला परीक्षेचा पेपर लीक करण्याचे आमिष दाखवून फूस लावण्याचे प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणाशी संबंधित एक कथित ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या व्हायरल क्लिपमध्ये आरोपी बीएससी (BSc)च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनीकडे लैंगिक सुखाची मागणी करत आहे. तो तिला ‘डार्लिंग, मी तुझ्यासाठी परीक्षेच्या पेपरची व्यवस्था केली आहे, परीक्षेपूर्वी परत ये, मी तो तुला येथे देईन’ असे म्हणत असल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे संबंधित विद्यार्थिनीला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.
या अत्यंत संवेदनशील प्रकरणाची माहिती मिळताच विद्यार्थिनीने विद्यापीठ प्रशासनाकडे धाव घेऊन तक्रार केली. त्यानंतर तात्काळ पावले उचलत विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक विद्यानंद त्रिपाठी यांनी पोलिसांत अधिकृत फिर्याद दिली. या तक्रारीच्या आधारे हसनगंज पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी प्राध्यापक परमजीत सिंग याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. दुसरीकडे, प्राध्यापक सिंग याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. विद्यापीठातील अंतर्गत राजकारणामुळे (इंटरनल पॉलिटिक्स) आपल्याला जाणीवपूर्वक अडकवले जात असून लक्ष्य केले जात असल्याचा दावा त्याने केला आहे. दरम्यान, विद्यापीठाचे कुलगुरू जे. पी. सैनी यांनी अंतर्गत तक्रार समितीला (आयसीसी) या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून 24 तासांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
विद्यापीठाचे कडक धोरण आणि अंतर्गत चौकशीचे आदेश
लखनौ विद्यापीठ प्रशासनाने या घटनेनंतर एक प्रसिद्धीपत्रक जारी करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विद्यापीठाची प्रतिष्ठा आणि शैक्षणिक वातावरणाला हानी पोहोचवणारे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असे प्रशासनाने ठामपणे सांगितले आहे. अशा गंभीर प्रकरणांमध्ये विद्यापीठ नेहमीच ‘झिरो टॉलरन्स’ नीतीचे पालन करते, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे विद्यापीठाच्या सुरक्षेवर आणि प्राध्यापकांच्या वर्तणुकीवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात असून, अंतर्गत समितीच्या अहवालानंतर प्राध्यापकावर आणखी कायदेशीर आणि प्रशासकीय बडगा उगारला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



