भारतीय अब्जाधीश गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांनी त्यांच्याविरोधात अमेरिकेत दाखल असलेल्या फसवणुकीच्या दिवाणी खटल्यात एकत्रितपणे 1.8 कोटी डॉलर (सुमारे 172 कोटी) दंड भरून हे प्रकरण मिटवण्याला मान्यता दिली आहे.
2024 मध्ये अमेरिकेच्या नियामकाने अदानी समूहावर भारतातील मोठ्या अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप केला होता. तसेच निधी उभारण्यासाठी बाँड विक्री करताना अमेरिकन गुंतवणुकदारांची दिशाभूल केल्याचाही आरोप होता.
या सामंजस्य प्रस्तावाला न्यायालयाची मंजुरी मिळणं बाकी आहे. परंतु, या घडामोडीनंतर शुक्रवारी (15 मे) अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली.
अदानी समूह हा भारतातील सर्वात मोठ्या उद्योगसमूहांपैकी एक असून ऊर्जा, विमानतळ यासह अनेक क्षेत्रांत ते कार्यरत आहेत.
वाचा सविस्तर– गौतम अदानींवर लाचखोरीचे आरोप झालेत, ते प्रकरण नेमकं काय आहे?
गुंतवणूकदारांची दिशाभूल आणि लाचेचे आरोप
या सामंजस्य प्रस्तावात आरोप मान्यही केलेले नाहीत आणि नाकारलेलेही नाहीत. तसेच भविष्यात गुंतवणूकदारांची फसवणूक, सिक्युरिटीज फसवणूक किंवा बाजारात गैरप्रकार (मार्केट मॅनिपुलेशन) केल्यास अमेरिकेच्या कायद्यांनुसार कारवाई होऊ शकते.

2024 मधील खटल्यात अदानींवर गुंतवणुकदारांची दिशाभूल करून 750 दशलक्ष डॉलर (सुमारे 720 कोटी रुपये) उभारल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये सुमारे 175 दशलक्ष डॉलर अमेरिकन गुंतवणूकदारांकडून घेतल्याचंही म्हटलं होतं.
तसेच अदानी ग्रीन एनर्जी लाचलुचपतविरोधी नियमांचं पालन करत असल्याबाबत गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचाही आरोप होता. मात्र अदानी समूहाने हे सर्व आरोप ‘निराधार’ असल्याचं म्हटलं आहे.



